Pune Sevasadan Society

शताब्दी महोत्सव – पुणे सेवासदन संस्था, सोलापूर

पुणे सेवासदन संस्था, सोलापूर शाखेच्या शताब्दी महोत्सवाचा समारोप सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. त्या अंतर्गत दि. १९ एप्रिल ते २१ एप्रिल २०२३ दरम्यान निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. १९ एप्रिल २०२३ रोजी या तीन दिवसीय सांगता समारंभाचे उद्घाटन पुणे सेवासदन संस्थेच्या कार्याध्यक्षा अश्विनी गानू, सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळच्या सत्रामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांचे ‘स्त्री शिक्षण’ या विषयावर कीर्तन आयोजित करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि. मो. मेहता प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. अपर्णा सहस्त्रबुद्धे यांनी केले.

दुसऱ्या सत्रात संध्याकाळी सुरेल सांगीतिक मैफल झाली. यामध्ये श्री. विलास कुलकर्णी, सौ. प्राजक्ता देशपांडे आणि मेघाम्बरी साळुंखे यांनी सादर केलेल्या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे निवेदन श्री. माधव देशपांडे यांनी केले. तबल्यावर साथ पं. आनंद बदामीकर श्रीराम कुलकर्णी, पखवाजवर श्री, देवेंद्र आयाचित, व्हायोलीनवर श्री जयंत जोशी तर ऑक्टोपडवर जब्बार मुर्शद यांनी साथ केली.

दि. २० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता ‘स्त्रियांचे शिक्षणातील योगदान’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये कवयित्री डॉ. वर्षा तोडमल, लेखिका मृणालिनी जोशी – कानिटकर, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा तसेच आ. प्रणितीताई शिंदे यांनी आपले मौलिक विचार मांडले. या परिसंवादाचे अध्यक्षपद डॉ. सुहासिनी शहा यांनी भूषविले तर निवेदन डॉ. प्रिया निघोजकर यांनी केले.

दि. २१ एप्रिल २०२३ रोजी शताब्दी वर्षाचा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका मा. शीला पतकी यांना जीवनगौरव पुरस्काराने तर वनमाला किणीकर यांना शताब्दी विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानप्रबोधिनी पुणेचे अध्यक्ष मा. गिरीश बापट होते. यावेळी पुणे सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा मा. वर्षा परांजपे, उपाध्यक्ष मा. श्री. नितीन लेले, सरचिटणीस मा. श्री. चिंतामणी पटवर्धन तसेच सोलापूर शाखेच्या अध्यक्षा मा. सौ. शीला मिस्त्री, सचिवा सौ. वीणा पतकी, संचालक डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ. राजीव प्रधान, श्री. राजेंद्र गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही झाला. नांदीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. रमाबाई रानडे जीवनपट, यक्षगान, आणि त्यानंतर शताब्दी गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.