Pune Sevasadan Society

सेवासदन -    १९०९-पासून महिला सक्षमीकरणाचे प्रणेते

दिलासा केंद्र

स्त्री शिक्षणाचे महत्व आणि गरज ह्याचे महत्व लक्षात आल्याने १९०९ साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी कै.रमाबाई रानडे यांनी स्वतःच्या राहत्या घरात पुणे सेवासदन संस्थेची  स्थापना केली.सेवासदन संस्थेने विशेष म्हणजे बौद्धिक अक्षम मुलांच्या शिक्षणाची गरज ओळखून दिलासा केंद्र या विशेष मुलांच्या शाळेची स्थापना सन १९८२ मध्ये केली गेली.

‘दिलासा’ म्हणजेच या विशेष मुलांच्या पालकांना एक प्रकारचा आधार आहे. दिलासा केंद्र खरोखरच या विशेष मुलांच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम घेत आहे. सध्या शाळेत ०६ ते १८ वयोगटातील ५२ विद्यार्थी व ४८ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.

१८ वर्षाच्या पुढील प्रौढ विद्यार्थ्यांसाठी सेवासदन संस्थेतर्फे एरंडवणे येथे दिलासा कार्यशाळा हा व्यवसाय प्रशिक्षण देणारा विभाग चालविला जातो.सर्व सामन्यांप्रमाणे या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे खूप अवघड आहे.दिलासा केंद्रात या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे विशेष प्रशिक्षण घेतलेले विशेष शिक्षक व कलाशिक्षक, वर्ग सहाय्यक आहेत. त्यांना मुख्याध्यापक तसेच कार्यालयीन कर्मचारी यांचे चांगले सहकार्य लाभते याचप्रमाणे स्कुलबसचे वाहन चालक,वाहन परिचर व पहारेकरी यांचेही चांगले सहकार्य असते.

दिलासा केंद्राची उद्दिष्टे व ध्येय पुढीलप्रमाणे

१) विद्यार्थांचा सर्वांगीण विकास करणे

२) विद्यार्थांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे

३) व्यवसाय पूर्व प्रशिक्षण देणे

४) सामाजिक जागृती निर्माण करणे.

५) पालकांना मार्गदर्शन करणे

६) शैक्षणिक आणि दैनंदिन जीवनाविषयीचे प्रशिक्षण देणे

 शहराच्या मध्यवर्तीचे ठिकाण,प्रशिक्षित शिक्षक वर्ग,पोषक आहार,नियमित वैद्यकीय तपासणी हि दिलासाची प्रमुख वैशिष्ठे आहेत.नियमित शालेय शिक्षणाबरोबरच खेळ,संगीत,नाट्य व नृत्य तसेच चित्रकला यामध्येही विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.शाळेतील विद्यार्थी व शिक्षक विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मोठीमोठी बक्षिसे मिळवून आणतात तेव्हा संस्थेला खरच अभिमान वाटतो.

त्यापैकी एक म्हणजे सन २००७ साली कु.गौरी गाडगीळ या दिलासा केंद्राच्या विद्यार्थिनीने चीन येथील बीजिंग शहरात स्पेशल ऑलिम्पिकच्या पोहण्याच्या स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधीत्व केले व रजत पदक मिळविले होते.

तसेच कु.संयुक्ता गोसावी ही विद्यार्थिनी सन २०१६ मध्ये बास्केट बॉल या खेळासाठी अमेरिका येथे जाऊन कांस्य पदक पटकावून आली.बॅडमिंटन या खेळासाठी कु.गायत्री भालेराव हिने गुजरात येथे सुवर्ण पदक पटकावले.तसेच या सर्व विद्यार्थीनींनी लोकनृत्य स्पर्धेतही विविध बक्षिसे शाळेला मिळवून दिली.शाळेतील क्रीडा शिक्षक श्री.अशोक जाधव हे सन २०१३ मध्ये स्पेशल ऑलिम्पिकच्या जागतिक हिवाळी स्पर्धेत साऊथ कोरिया येथे फ्लोअर हॉकी या खेळासाठी विशेष प्रशिक्षक म्हणून गेले होते.

विविध संस्थातर्फे भरविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अनेक मानाची बक्षिसे,ट्रॉफीज मिळवून आणलेल्या आहेत व सेवासदन संस्थेला एक मनाचे स्थान मिळवून दिले आहे.