Pune Sevasadan Society

सेवासदन -    १९०९-पासून महिला सक्षमीकरणाचे प्रणेते

पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूर

महाराष्ट्राच्या स्त्री शिक्षणातील  अध्वर्यु व थोर समाजसेविका कै. रमाबाई रानडे यांनी २ ऑक्टोबर १९०९ रोजी पुणे सेवासदन संस्थेची स्थापना केली. ‘ मना चंदनाचे परि त्वां झिजावे ‘हे संस्थेचे ब्रीद सार्थ करीत आणि ‘ स्त्रियांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना सर्वार्थाने सर्वांगीण शिक्षण देणे’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत संस्थेची शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. सोलापूर सेवासदन ही मातृसंस्थेची अत्यंत भक्कम व उज्ज्वल वारसा जपणारी शाखा आहे.

कै. डॉ.रावबहाद्दूर मुळे यांच्या पुढाकाराने कै. गोपाळ कृष्ण देवधर यांनी १ मे १९२३ रोजी पुणे सेवासदन संस्थेच्या सोलापूर शाखेची पायाभरणी केली. पुढे मा. रामलाल परदेशी, मा. शेठ गोविंदजी रावजी दोशी, मा.श्री. किसनजी भैय्या, डॉ घन:श्याम तगारे, मा.श्री. परबतसिंग घायलोद, मा. ताराबाई रानडे यांच्या दातृत्वाने आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सहाय्याने सोलापूरच्या मध्यवर्ती भागात प्राथमिक शाळा व प्रशालेची मुख्य इमारत, वसतिगृह, सांस्कृतिक कलामंदिर, बालवर्ग, कनिष्ठ महाविद्यालय, कलादालन व ग्रंथालय, संस्था कार्यालय असा सोलापूर सेवासदनचा विस्तार होत गेला आणि एकाच आवारातील ‘सेवासदन संकुल’ आकाराला आले. आजमितीस सोलापूरच्या दैदीप्यमान वाटचालीत सेवासदन नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे.

 सन २०२२- २३ हे वर्ष सोलापूर सेवासदनचे शतकमहोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या सीमाभागातील सोलापूरसारख्या गिरणगावातील सेवासदनची ही शतकी वाटचाल सोलापूरच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

 

सेवासदनचे अंतरंग

केवळ मुलींसाठीच कार्यरत असणाऱ्या सोलापूर सेवासदनमध्ये सध्या बालवर्ग विभागात ४००, प्राथमिक विभागात ८००, प्रशाला विभागात १७००, स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयात २५० अशा साधारणतः ३२०० मुली समृद्ध शिक्षण घेत आहेत. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी अत्यल्प दर आकारून सेवाभावीवृत्तीने ‘ गोकुळ पाळणाघर’  हा विभाग कार्यरत आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील मुलींसाठी वसतिगृह आहे. ते अत्यंत सुरक्षित असून सध्या तिथे १८० विद्यार्थिनी निवासी शिक्षण घेत आहेत. त्यांना रास्त शुल्कात चौरस आहार दिला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा म्हणून शासनाचे दहा लाखांचे विशेष अनुदान सेवासदन सोलापूर शाखेला मिळाले आहे.

आजपर्यंत क्रीडा क्षेत्रात अनेक विद्यार्थिनीनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेले आहे तसेच शिक्षकांनीही राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेले आहे. 

उत्तम शिक्षण आणि संस्कार यामुळे पालकांचा विश्वास आणि पाठिंबा संस्थेला मिळत असल्याने संस्थेची शिक्षण क्षेत्रात पथदर्शी वाटचाल सुरू आहे.

 

आमची वैशिष्ट्ये :- 

१) गृहशास्त्राचे शिक्षण देणारी सोलापुरातील एकमेव संस्था.

२) इयत्ता १ ली पासूनच मुलींना संगणक विषयाचे प्रशिक्षण.

३) वाड्या वस्त्यांवर  राहणाऱ्या, अत्यल्प शिकलेल्या अथवा अशिक्षित महिलांना प्रबोधनपर शिक्षण देणारी ‘रानफूल योजना’. (इयत्ता ९ वीच्या विद्यार्थिनी यात प्रशिक्षकांची भूमिका बजावतात.)

४) आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने मुलींसाठी ज्युदो, कराटे, तलवारबाजी प्रशिक्षण तसेच R.S.P.  चे विशेष प्रशिक्षण.

५) प्रशाला विभागात वाढत्या प्रतिसादानुसार इयत्ता ५ वी ते १० वी सेमी इंग्रजीच्या प्रत्येकी तीन तुकड्या.

६) शालान्त परीक्षेत विद्यार्थिनींना सुयश प्राप्त व्हावं, त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत  कोणताही अडसर येऊ नये म्हणून एका शिक्षकांकडे पाच मुली दत्तक देऊन त्यांच्या सर्वांगीण प्रगतीची जबाबदारी असलेली “यशोदानंद दत्तक पालक योजना”.

७) शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा व विज्ञान विषयाची अभिरूची वाढावी या उद्देशाने संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष कै. मन्मथराव रुद्राक्षी यांच्या स्मरणार्थ  ग्रामीण व शहरी शालेय स्तरावरील मुलामुलींसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन.

८) दरवर्षी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘कलाकौमुदी’ युवती महोत्सवाचे आयोजन.

९) गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न, तसेच सोलापूर विद्यापीठमान्य अभ्यासक्रमाचे केंद्र असलेला श्रुतीगंधार हा संगीत विभाग १९५७ पासून कार्यरत.

१०) प्रशाला विभागाचे उज्ज्वल परंपरा असलेले उत्तम बँडपथक.

११) शालेय जीवनात लोकशाहीची तोंडओळख व्हावी म्हणून विद्यार्थिनींसाठी स्वराज्य सभा निवडणुकीचे दरवर्षी आयोजन.

१२) शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थिनी कलानिपुण व्हाव्यात यासाठी अनेक वर्षांपासून वासंतिक छंदवर्गाचे आयोजन.  (रांगोळी,मेंदी, चित्रकला, पाककला, नृत्य, इंग्लिश संभाषण वर्ग, मराठी सुलेखन वर्ग आदींचा समावेश)

१३) संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय बालशिक्षण परिषद अधिवेशनाचे आयोजन.( सन 2003)

१४) संस्थेच्यावतीने ‘अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलना ‘चे यशस्वी आयोजन.(सन 2006)

१५) सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तबगार स्त्रियांना संस्थेच्यावतीने ‘हिरकणी व रमाबाई रानडे पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याची परंपरा.

      

पुणे सेवासदन संस्थेच्या सोलापूर शाखेला अनुभवसंपन्न अशा अध्यक्षांची परंपरा लाभली आहे

१) कै. दादासाहेब मुळे, (१९२३ ते १९४०)

२) कै. डॉ. भा. वा. मुळे, (१९४० ते १९७२)

३) कै. कुमुदिनीबाई दोशी,( १९७२ ते १९९७)

४) कै. कुमुदिनीबाई प्रधान, (१९९७ ते १९९९)

५) कै. मन्मथराव रुद्राक्षी, (१९९९ ते २००५ )

६) विद्यमान अध्यक्ष सौ. शीला मिस्त्री (२००५ पासून)

 

आमचे काही समाजाभिमुख व शुभंकर प्रस्तावित संकल्प-

१)  मुलींसाठी स्वतंत्र इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणे.

२) सध्याच्या वसतिगृहाचे आणि सभागृहाचे नुतनीकरण करणे.

३) नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह सुरू करणे.

४) महिलांसाठी अद्ययावत व्यायाम सुविधा व लघुउद्योगनिर्मिती केंद्र सुरू करणे.

५)  कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींसाठी ‘कमवा व शिका’ योजना सुरू करणे.

६) ज्येष्ठ नागरिकांसाठी सुखावह व सहाय्यभूत योजना सुरू करणे.